Type Here to Get Search Results !

वणीत भाजपकडून ‘तान्हा पोळा’ सजावट स्पर्धा, बालगोपालांना मिळणार रोख बक्षिसांसह आकर्षक भेटवस्तू




वणी : 


          भारतीय जनता पार्टी वणी शहराच्या वतीने वणी शहरातील बालगोपालांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘तान्हा पोळा सजावट स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक पोळा सणाची संस्कृती बालमनात रुजविण्यासोबतच पर्यावरणपूरक सजावटीचा संदेश देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.


          ही स्पर्धा शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कल्याण मंडपम, मोठा हनुमान मंदिराजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे होणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश पूर्णपणे निःशुल्क असून वणी शहरातील बालगोपालांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


            स्पर्धेसाठी दोन वयोगट करण्यात आले असून ‘अ’ गटात १ ते ५ वर्षे वयोगटातील बालगोपालांसाठी प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर ‘ब’ गटात ६ ते १२ वर्षे वयोगटातील स्पर्धकांसाठी प्रथम क्रमांक ४ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक २ हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक गटासाठी प्रत्येकी १ हजार रुपयांची तीन प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार असून सहभागी बालगोपालांसाठीही आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.


              स्पर्धेतील सजावट पर्यावरणपूरक आणि स्वदेशी वस्तूंच्या माध्यमातून करण्यात यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धकांनी दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक असून स्पर्धेच्या वेळेच्या किमान १० मिनिटे आधी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.


          पारंपरिक पोळा सण, बैलांविषयीचा स्नेह, भारतीय संस्कृती आणि पर्यावरणसंवर्धनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमातून बालगोपालांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासोबतच पारंपरिक संस्कृतीशी जोडण्याची संधी मिळणार आहे.


        या स्पर्धेचे संयोजक श्री. रवि बेलूरकर, जिल्हा उपाध्यक्ष, यवतमाळ असून सौ. नीता पिदूरकर, श्रीमती वैशाली वातिले, सौ. प्रतिभा मंथनवार, श्री. विलास डवरे, श्री. मयूर गोयनका आणि श्री. नितीन बिहारी हे सहसंयोजक म्हणून कार्यरत आहेत.


         वणी शहरातील पालकांनी आपल्या पाल्यांना या स्पर्धेत सहभागी करून त्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन माजी आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार आणि ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी, शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी वणी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad