Type Here to Get Search Results !

रस्ता दुरुस्त करा, अन्यथा आंदोलन अटळ; फाल्गुन गोहोकारांचा प्रशासनाला इशारा


वणी : 

          नांदेपेरा ते शेलू या मुख्य रस्त्याची झालेली दयनीय अवस्था तात्काळ सुधारावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद प्रशासनाला अंतिम निवेदन देण्यात आले. रस्त्याची तातडीने दुरुस्ती सुरू न केल्यास ३ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेपेरा रस्त्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा गोहोकार यांनी प्रशासनाला दिला.

   

       नांदेपेरा ते शेलू मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शेलू येथील मंदिरात जाणाऱ्या भाविकांची दररोज मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

       

        या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत मनसेच्या वतीने यापूर्वीही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा व पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र अद्यापही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ सप्टेंबरपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास ग्रामस्थ आणि महाराष्ट्र सैनिकांच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा फाल्गुन गोहोकार यांनी दिला. आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


              या संदर्भातील निवेदनाच्या प्रती यवतमाळ जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वणीचे तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.


        निवेदन देतेवेळी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्यासह धिरज पेचे, प्रदीप बदकल, प्रवीण मांडवकर, सुरज गावंडे, रुपेश जोगी, गणेश मोहितकर, शुभम मस्की, संदीप काकडे, देविदास आवारी, निखिल दानव, वनिता आवारी, युवराज आवारी, योगेश नांदेकर, संजय वासेकार, विजय डवरे, किशोर सूर, रोहित झोडे यांच्यासह असंख्य नागरिक व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image