Type Here to Get Search Results !

सर्पदंशावर अघोरी उपचार केल्यास दंड व शिक्षेची तरतूद


 वर्धा : 


     पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना वाढतात. सर्पदंश झाल्यास मंत्रतंत्र, अघोरी अथवा अवैद्यकीय उपचार न करता तातडीने सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव व सर्प अभ्यासक गजेंद्र सुरकार यांनी केले.



       नागपंचमीनिमित्त महाराष्ट्र अंनिस व विदर्भ सर्पमित्र मंडळाच्या पुढाकाराने देवळी रोड, वर्धा येथील त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या मुलांच्या वसतिगृहात सर्पविज्ञान व पर्यावरण प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विषारी साप, सर्पदंशाची लक्षणे, प्रथमोपचार, वैद्यकीय उपचार तसेच सापांबाबतचे गैरसमज व अंधश्रद्धा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.


       सर्पदंश झाल्यानंतर जखमेवर खडा लावणे, मंत्र मारणे, जखमेला चिरा देणे किंवा विष तोंडाने ओढणे यांसारखे प्रकार टाळावेत. नाग, मण्यार, फुरसे व घोणस या विषारी सापांच्या दंशावर शासकीय रुग्णालयात उपचार उपलब्ध असल्याचे सुरकार यांनी सांगितले.


         अवैज्ञानिक किंवा अघोरी उपचार करून व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण केल्यास संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्रातील जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. अशा प्रकारात उपचार करणाऱ्यासोबतच उपचार घेणारा किंवा त्याला सहकार्य करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. दोष सिद्ध झाल्यास सात वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सर्पदंश, विंचूदंश किंवा कुत्रा चावल्यानंतर कोणत्याही अघोरी उपचाराला बळी न पडता तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन सुरकार यांनी केले.


       कार्यक्रमास ५० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक हेडावू, प्रास्ताविक वैभव म्हैसकर तर आभार गौरव परतपुरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad