मारेगाव :
लग्नासाठी सोन्याचे दागिने देण्याची मागणी करून विवाह मोडण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप करत एका व्यक्तीच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलीचा विवाह कळंब तालुक्यातील एका युवकासोबत ठरला होता. साक्षगंधाचा कार्यक्रमही पार पडला होता. त्यानंतर युवकाच्या नातेवाईकांनी लग्नावेळी मुलीला सोन्याचे दागिने देण्याचा आग्रह धरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे अशी मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे तक्रारदाराने सांगितले होते.
दरम्यान, संबंधित युवक काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती तक्रारदाराला देण्यात आली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत युवक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले, मात्र याबाबत पोलिसांत तक्रार का देण्यात आली नाही, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराने संबंधित युवक, त्याची आई व इतर नातेवाईकांनी संगनमत करून सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीसाठी विवाह मोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध हुंडाबंदी अधिनियम, 1961 च्या कलम 4 तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 च्या कलम 3(5) अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या