वणी :
शिक्षणाला केवळ पाठ्यपुस्तकं व गुणांच्या चौकटीत न अडकवता त्याला नवं शैक्षणिक तंत्रज्ञान, मूल्ये आणि शैक्षणिक गुणवत्तेची नवी दिशा देणारी “Technology Led Excellence in Teaching” या विषयावरील एक दिवसीय 'शिक्षक कार्यशाळा', लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, यांच्या संयुक्त विद्यमाने, लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल, देशमुखवाडी, वणी येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाजप्रबोधन, स्वच्छता आणि शिक्षणाच्या मूल्यांवर आधारलेला त्यांचा विचार आजच्या आधुनिक शिक्षणव्यवस्थेसाठीही मार्गदर्शक ठरतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करताना, मानवी मूल्ये, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांची सांगड घालणे अत्यावश्यक असून, शिक्षकांनी बदल स्वीकारतांना विद्यार्थ्यांच्या मनाचा, भावविश्वाचा आणि चारित्र्याचा विकास केंद्रस्थानी ठेवावा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. हरिओम पुण्यानी (नागपूर) यांनी “Excellence in Teaching” या विषयावर सखोल विचार मांडले. शिक्षक हे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणारे नसून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व घडविणारे शिल्पकार आहेत, हे स्पष्ट करत त्यांनी अध्यापनात नाविन्य, संवेदनशील दृष्टिकोन, सकारात्मक संवाद आणि सातत्यपूर्ण आत्मपरीक्षण यांचे महत्त्व प्रभावी शब्दांत मांडले.तसेच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन गुणांच्या आधारे न करता त्यांच्यातील कौशल्यांवर करावे असे महात्मा गांधींच्या 'नई तालीम' संकल्पनेतून स्पष्ट केले. शिक्षकांनी शिकवण्याचा आनंद घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. बदलत्या काळात शिक्षकांनी डिजिटल साक्षर व तंत्रस्नेही होणं आवश्यक असून नवंनवीन तंत्रज्ञान व पद्धती आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी केले.
दुसऱ्या सत्रात डॉ. कौशिक जोशी (अमरावती) यांनी “AI and Teaching Excellence” या विषयावर मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून शिक्षण अधिक जिवंत, रंजक,सहभागात्मक आणि भविष्योन्मुख कसे करता येईल, याचे प्रात्यक्षिकांसह केलेले सादरीकरण उपस्थित शिक्षकांसाठी विशेष प्रेरणादायी ठरले. तसेच शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांशी सतत सकारात्मक संवाद साधला पाहिजे असे सांगितले.
संपूर्ण कार्यशाळा अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनपूर्वक आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. प्रभावी वक्ते, स्पष्ट, अभ्यासपूर्ण व रंजक प्रतीपादन शैलीमुळे कार्यशाळा यशस्वी झाली.
या शिक्षक कार्यशाळेत लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकां सोबतच शहरातील मॅकरून स्टूडेंट अकॅडमी, ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल, संताजी इंग्लिश मिडीयम स्कूल,सुशगंगा पब्लिक स्कूल,मकैंडेय पोद्दार लर्न स्कूल व न्यू व्हिजन इं मिडी.स्कूलचे शिक्षक सहभागी झाले होते. मान्यवरांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत, अशा कार्यशाळांचे नियमितपणे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यशाळेचे प्रभावी संचालन सौ.पंपा मित्रा यांनी केले प्रास्ताविक प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांनी केले तर डॉ अभिजित अणे यांनी आभार मानले.
समारोपप्रसंगी आयोजकांच्या वतीने मान्यवर वक्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब वणी चे अध्यक्ष लायन तुषार नगरवाला, लायन्स शाळेचे अध्यक्ष उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर,लायन प्रमोद देशमुख, लायन पुरुषोत्तम खोब्रागडे, लायन किशन चौधरी, लायन महेंद्र श्रीवास्तव, लायन डॉ विजय राठोड,लायन वीणा खोब्रागडे, अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य गजानन कासावार, शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्य चित्रा देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवण्याची प्रेरणा देणारी ही कार्यशाळा वणीच्या शैक्षणिक वातावरणाला नवी ऊर्जा, नवा दृष्टिकोन आणि नवचैतन्य देणारी ठरली.






टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या