“साप हा वाघ, बिबट्या, अस्वल यांच्याप्रमाणेच वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत संरक्षित आहे. सापाला मारल्यास, जखमी केल्यास, विक्री किंवा वाहतूक केल्यास सात वर्षांची सजा आणि पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो,” अशी माहिती विदर्भ सर्पमित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी दिली.
ते सम्यक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर येथे आयोजित “सर्पविज्ञान आणि पर्यावरण” या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. सुरकार म्हणाले, “सापांचे अस्तित्व मानवी हस्तक्षेप, जंगलतोड आणि अंधश्रद्धेमुळे धोक्यात आले आहे. विषारी सापांच्या दंशावर सरकारी रुग्णालयात हमखास औषध उपलब्ध आहे, तरी लोक अघोरी उपचारांकडे वळतात. त्यामुळे अनेकांचे जीव जातात. अशा उपचारांवर सात वर्षांपर्यंत सजा व पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.”
सर्पमित्रांचे योगदान अधोरेखित करताना त्यांनी सांगितले, “सर्पमित्र लोकांचे प्राण वाचवतात, पण शासनाकडून ना आर्थिक मदत ना विमा संरक्षण मिळते. शासनाने त्यांना सन्मान आणि सुरक्षा द्यावी.”
कार्यक्रमात प्रोजेक्टरद्वारे विषारी व बिनविषारी सापांची ओळख, सर्पदंशावर वैज्ञानिक उपचार आणि अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मा. लोहट सर, सूत्रसंचालन हजारे मॅडम, आभारप्रदर्शन वनकर मॅडम यांनी केले. या कार्यक्रमात ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या