Type Here to Get Search Results !

शेतकरी व समाजजीवनाला दिशा देणाऱ्या व्याख्यानमालेच्या नेतृत्वाची जबाबदारी मांडवकरांकडे

मारेगाव : 

          तालुक्यातील शेतकरी आणि समाजजीवनाशी निगडित असलेल्या बळीराजा व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी येथील आघाडीचे उद्योजक, समाजकार्यकर्ते आणि तरुण नेतृत्व अनंत मांडवकर यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली.

               शिव महोत्सव समितीच्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीस मावळते अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांनी मार्गदर्शन केले, तर उपाध्यक्ष प्रा. डॉ. करमसिंग राजपूत हे अध्यक्षस्थानी होते. चर्चेनंतर सर्व सदस्यांनी समितीतील ज्येष्ठ सदस्य तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनंत मांडवकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.


📌 पूर्वीचे नेतृत्व :- 

                       समितीची स्थापना झाल्यापासून अनेक दिग्गजांनी अध्यक्षपद भूषवले आहे. पहिल्या अध्यक्षपदी एड. निलेश चौधरी, दुसऱ्या अध्यक्षपदी डॉ. रमेश सपाट तर तिसऱ्या अध्यक्षपदी शहाबुद्दीन अजाणी यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे, मा. अजाणी यांनी सलग चार वर्षे अध्यक्षपद सांभाळून व्याख्यानमाला उपक्रमाला नवा उभारी दिला. त्यांच्या कार्यकाळात विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे कार्यक्रम आणि समाजप्रबोधनपर उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले.


📌 अनंत मांडवकर यांचा परिचय :- 

                         नवीन अध्यक्ष अनंत मांडवकर हे बी.ई.(सिव्हिल) पदवीधर असून मारेगाव शहरातील अमन ट्रेडर्स या प्रतिष्ठानचे संचालक आहेत. व्यावसायिक क्षेत्रासोबतच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. सध्या ते मराठा सेवा संघाच्या अमरावती विभागाचे उपाध्यक्ष असून पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळींमध्ये त्यांचे सक्रिय योगदान राहिले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणामुळे आणि सर्वसमावेशक दृष्टीकोनामुळेच समितीने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.


📌 मावळते अध्यक्षांचे मनोगत :-

             या निवडीच्या प्रसंगी मावळते अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. त्यांनी, “मी अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण मनापासून पार पाडला. पुढेही समितीच्या प्रत्येक उपक्रमासाठी माझे सहकार्य कायम राहील,” असे आश्वासन दिले.


📌 नवीन अध्यक्षांची भूमिका :- 

                        नवीन अध्यक्ष अनंत मांडवकर यांनी आपल्या निवडीबद्दल समितीचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “बळीराजा व्याख्यानमाला ही शेतकरी, विद्यार्थी आणि समाजमनाला दिशा देणारी चळवळ आहे. तिचा व्याप आणि प्रभाव वाढविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. व्याख्यानमाला अधिक दर्जेदार, लोकाभिमुख आणि प्रेरणादायी व्हावी, यासाठी माझा कटाक्ष असेल.”

           अनंत मांडवकर यांच्या निवडीमुळे समितीच्या कार्याला नवी ऊर्जा व दिशा मिळेल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या