शहरातील रवी नगर येथील लायन्स इंग्लिश मिडियम स्कूल येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 169 वी जयंती बुधवार, दिनांक २३ जुलैला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व अकॅडेमीक डायरेक्टर प्रशांत गोडे मंचावर उपस्थित होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. प्रशांत गोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी रुही खराटे, नैतिक ढुमने, उन्नती आंदे, कृष्णा सूर या विद्यार्थ्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर उत्स्फूर्त भाषणे दिली. यानंतर शिक्षक शेखर घुगुल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, लोकमान्य टिळकांनी केलेले कार्य अभूतपूर्व आहे. त्यांचे योगदान पुढील पिढीला विसरता येणार नाही, असे सांगितले.
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच' हा मंत्र लोकमान्य टिळकांनी दिला. त्यांनी देशासाठी केलेले कार्य कौतुकास्पद असून अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनीही त्यांचे गुण अंगीकारावे, असे प्रतिपादन प्रा. प्रशांत गोडे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार शिक्षिका सौ. शुभांगी बरडे यांनी मानले.




