वणी/प्रतिनिधी : नगर पालिका द्वारे शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी काढण्यात आलेली निवीदा मध्ये नियमबाह्य श्रमतिरमटी टाकण्यात आल्यामुळे निवीदा धारकांना अडचण येत असल्याने ती निवीदा रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना वणी शहरप्रमुख ललित लांजेवार यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्याकडे दिनांक १२ फेब्रुवारी ला केली आहे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील सर्व घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषद कार्यालयाकडून निविदा प्रकाशित करण्यात आली होती. या निविदेत गरज नसतांना अनेक नियम आणि अटी लावुन निविदा धारकांना अडचणीत आणण्याचे आणि आपल्या मनमर्जीतिल कंत्राटदारांना काम देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसुन येते. निविदेच्या अनुषंगाने निविदा धारक हे भागिदारी व्यवसायिक नसावे असा उल्लेख करण्यात आला आहे. सदर नियम अद्याप कुठल्याही निविदेत आजवर निदर्शनास आले नाही आणि हा विषय संबंधित कंपनीचा व वयक्तीक विषय असुन त्यात १ किंवा अनेक भागीदार असु शकतात. सदर काम हे आरोग्य विषयक व स्वच्छतेचे असुन या कामाकरीता जिवन प्राधिकरणची नोंद मागविण्यात आली आहे. सदर अटीचा उद्देश काय असुन हि अट कोणत्या आधारावर शासन निर्णयावर आणि नगर विकास विभागाच्या नुसार लावण्यात आली आहे हा प्रश्न या ठिकणी उद्भवतो. सदर नोटीस हि ६ महिण्याच्या कालावधीत असुन त्यामध्ये अखंड ३ व ५ वर्षाचा अनुभव मागण्यात येत आहे? सदर अटी मध्ये वेगवेगळ्या ४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा ५ वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र मागण्यात आले आहे. सदर अट हि अद्याप कुठल्याही निविदेत टाकण्यात आली नाही. त्यामुळे नविन उद्योजकांकडे सर्व साधनसामग्री आणि मनुष्यबळ असतांना सुध्दा नव्या कंत्राटदारांना हे काम मिळावे नाही यासाठी आपण अशा अटी टाकुन हे काम आपल्या मनमर्जीतिल कंत्राटदाराला देण्याचे काम आपण करत आहे. हे प्रथम दर्शनी दिसुन येत आहे असे निवेदनात म्हटले आहे.
संपूर्ण वणी शहराची घनकचरा व्यवस्थापनासंबंधी पाहणी केल्याचे स्वच्छता निरीक्षक / अभियंता / मुख्याधिकारी यांचे Geo-Tagging प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील. हि २० क्रमांकाची अट जाणुनबुजुन घातल्याचे ही निवेदनात म्हटले आहे. या सर्व अटी आणि नियमांवरुन सदर निविदा ही आर्थिक देवाण - घेवाणीतुन मॅनेज केल्याचा आमचा थेट आरोप आहे. आजवर कोणत्याही निविदा मॅनेज करुन काम देण्यात आली नाही. आपण या ठिकाणी रुजु झाल्यापासुनच हा प्रकार वाढला असुन यासर्व अतिरिक्त अटी तात्काळ शिथील करुन हि निविदा रद्द करण्यात यावी जेणेकरुन स्थानिक भुमिपुत्रांना कामं करण्याची संधी प्राप्त होईल, अन्यथा शिवसेनाच्या वतीने आपणा विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर आपल्या कडुन काय कारवाई करण्यात आली ते येत्या २ दिवसात आम्हांस उलट ललित लांजेवार (शहर प्रमुख) टपाली पत्राद्वारे किंवा व्यतिश: कळवावे असेही निवेदनातून म्हटले आहे.


